‘ना कळले कधी तुला…’ मध्ये सुबोध-प्रार्थनाची जादुई केमिस्ट्री! ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’तील नवं गाणं व्हायरल
- August 8, 2025
- Ultra Team
Better Half Movie New Song Out : बेटर हाफ या आगामी मराठी सिनेमातील नवीन रोमँटिक गाणं नुकतंच रिलीज करण्यात आलं. जाणून घेऊया या नवीन सिनेमाविषयी.
सध्या सर्वत्र चर्चेत असलेला ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ हा मराठी चित्रपट एकामागून एक आशयपूर्ण झलक प्रेक्षकांसमोर आणत आहे. नुकतंच प्रदर्शित झालेलं ‘ना कळले कधी तुला’ हे प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला आले असून, यामध्ये सुबोध भावे आणि प्रार्थना बेहरे यांच्यात उमलणाऱ्या नात्याची नाजूक गाठ हळुवारपणे उलगडताना दिसतेय. हर्षवर्धन वावरे आणि बेला शेंडे यांच्या गोड, भावस्पर्शी आवाजात सादर झालेलं हे गाणं मनाला अलगद स्पर्शून जातं.
संजन पटेल आणि अमेय नरे यांनी संगीताची मांडणी केली असून गाण्याचे बोल संजय अमर आणि संजन पटेल यांचे आहेत. गाण्याच्या प्रत्येक ओळीत प्रेमाची गोडसर अस्वस्थता आणि नव्या नात्याची सुंदर चाहूल आहे.
दिग्दर्शक संजय अमर या गाण्याविषयी म्हणतात, ”कधी कळतं, तर कधी नकळत मनात कुणासाठी काहीतरी उलगडतं. ‘ना कळले कधी तुला’ हे गाणं त्या नकळत उगमाला आलेल्या प्रेमाचं सुंदर रूप आहे. सुबोध आणि प्रार्थनाच्या नजरेतून ते नातं फुलताना पाहाणं, हे प्रेक्षकांसाठीही एक अनुभव ठरणार आहे.”
चित्रपटाचे निर्माता रजत अग्रवाल सांगतात, “प्रेमातले निरागस भाव क्षणभरात मनात घर करतात. हे गाणं अगदी तसंच आहे, खरंखुरं आणि हृदयाशी नातं जोडणारं. प्रेक्षकांच्या मनाच्या कोपऱ्यात हे गीत नक्कीच घर करून जाईल, याचा मला पूर्ण विश्वास आहे.”
‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ हे लेखन, छायांकन आणि दिग्दर्शन संजय अमर यांचेच आहे. रजत मीडिया एंटरटेनमेंट प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माते रजत अग्रवाल असून, या चित्रपटात सुबोध भावे, प्रार्थना बेहरे, रिंकू राजगुरू आणि अनिकेत विश्वासराव यांची प्रमुख भूमिका आहेत. प्रेम आणि दुरावा यांचा उत्तम मेळ यात पाहायला मिळणार आहे. याआधी प्रदर्शित झालेला चित्रपटाचा टिझर आधीच लोकप्रिय ठरला असून, आता हे प्रेमगीतही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ २२ ऑगस्ट रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.