नात्यांच्या गुंतागुंतीवर भाष्य करणारी हटके प्रेमकहाणी ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’, ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला
- July 18, 2025
- Ultra Team
Better-Halfchi Lovestory : हास्याने भरलेली, धमाल प्रसंगांनी नटलेली आणि नात्यांच्या गुंतागुंतीवर भाष्य करणारी एक हटके प्रेमकहाणी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा प्रस्तुत ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ (Better-Halfchi Lovestory) हा चित्रपट एक मजेशीर लव्ह ट्रायंगल घेऊन येत आहे ज्यात नात्यांमधील गैरसमज, गोंधळ त्यातून उगम पावणारे हास्य यांचा सुरेख मिलाप पाहायला मिळेल.
या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर (Social Media) प्रदर्शित झाले असून, प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटात सुबोध भावे, प्रार्थना बेहेरे, रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) आणि अनिकेत विश्वासराव यांची कमाल केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. येत्या 22 ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात एका वेगळ्या आणि मजेशीर लव्ह ट्रायंगलची कहाणी पाहायला मिळेल.
दिग्दर्शक संजय अमर म्हणतात, “ मराठी प्रेक्षकांसाठी एक हटके संकल्पना असलेला चित्रपट घेऊन येत आहोत. ज्यामध्ये नात्यांमधल्या चढ-उताराची गोष्ट हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्यात आली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांचे नक्कीच मनोरंजन करेल.” निर्माते रजत अग्रवाल म्हणतात, “प्रेक्षकांसाठी काहीतरी वेगळा व मजेशीर आशय असलेला चित्रपट घेऊन येत आहोत. सुबोध भावे, रिंकू राजगुरू आणि प्रार्थना बेहेरे यांच्यासारख्या प्रतिभावान कलाकारांसोबत काम करणं हा अत्यंत खास अनुभव होता. प्रेक्षकांना हा चित्रपट नक्की आवडेल याची मला खात्री आहे.”
सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा प्रस्तुत रजत मीडिया एंटरटेनमेंट निर्मित ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ या चित्रपटाचे लेखन, छायांकन व दिग्दर्शन संजय अमर यांनी केले असून रजत अग्रवाल निर्माते आहेत. या चित्रपटाला साजन पटेल, अमेय नरे यांचे संगीत लाभले.