‘सौभाग्यवती सरपंच २’चा ट्रेलर आणि पोस्टर प्रदर्शित; ‘या’ तारखेपासून Ultra Jhakaas Marathi OTT वर प्रेक्षकांच्या भेटीला
- July 20, 2026
- Ultra Team
‘सौभाग्यवती सरपंच २’ चा ट्रेलर आणि पोस्टर प्रदर्शित झाले असून, ही वेब सिरीज २४ जुलै २०२६ पासून अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. दुसऱ्या पर्वात गावपातळीवरील राजकारण, सत्तासंघर्ष, अफवांचे राजकारण आणि पाणीटंचाईसारख्या सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
- पाणीटंचाईसारख्या सामाजिक प्रश्नांना कथानकाचा केंद्रबिंदू बनवण्यात आले आहे.
- प्रत्येक संकटाला धैर्याने सामोरे जात ती आपल्या तत्त्वांशी तडजोड न करता लोकांच्या विश्वासासाठी लढताना दिसते.
- वेब सिरीज २४ जुलै २०२६ पासून अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर पाहता येणार आहे.
महिला सक्षमीकरणाचा प्रभावी संदेश देत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली लोकप्रिय वेब सिरीज ‘सौभाग्यवती सरपंच’ आता नव्या पर्वासह परतत आहे. ‘सौभाग्यवती सरपंच २’ चा ट्रेलर आणि पोस्टर प्रदर्शित करण्यात आला असून, ही बहुप्रतीक्षित वेब सिरीज २४ जुलै २०२६ पासून अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. पहिल्या भागात एका सामान्य महिलेचा सरपंचपदापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास आणि महिला नेतृत्वाची ताकद प्रभावीपणे मांडण्यात आली होती. प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता दुसऱ्या पर्वात कथा अधिक व्यापक आणि संघर्षमय स्वरूपात पुढे सरकते. यावेळी गावपातळीवरील राजकारण, सत्तासंघर्ष, अफवांचे राजकारण, नातेसंबंधांतील गुंतागुंत आणि पाणीटंचाईसारख्या सामाजिक प्रश्नांना कथानकाचा केंद्रबिंदू बनवण्यात आले आहे.
कथेत अण्णा गाव सोडल्यानंतर त्याच्या जागी नाना नावाचा अधिक धूर्त आणि प्रभावशाली प्रतिस्पर्धी मैदानात उतरतो. तो केवळ राजकारण करत नाही, तर गावात खोट्या अफवा पसरवून आणि नात्यांमध्ये फूट पाडून अवलीविरोधात वातावरण तयार करतो. खोटे आरोप, कौटुंबिक संघर्ष आणि बालविवाहाच्या प्रकरणामुळे अवलीची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न होतो. मात्र, प्रत्येक संकटाला धैर्याने सामोरे जात ती आपल्या तत्त्वांशी तडजोड न करता लोकांच्या विश्वासासाठी लढताना दिसते.
‘सौभाग्यवती सरपंच २’मध्ये सत्ता, स्वार्थ आणि अफवांच्या राजकारणाविरुद्ध सत्य, धैर्य आणि लोकहिताची लढाई अधिक प्रभावीपणे उलगडली जाणार आहे. अवली पुन्हा एकदा गावाचा विश्वास संपादन करू शकेल का, याची उत्सुकता संपूर्ण कथेत कायम राहते. या वेब सिरीजमध्ये देविका दफ्तरदार, किशोर कदम, आशा ज्ञाते, मिलिंद शिंदे, अश्विनी कुलकर्णी आणि पद्मनाभ भिंड यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दिग्दर्शक संतोष कोल्हे यांनी ग्रामीण वास्तव, सामाजिक प्रश्न आणि मनोरंजनाचा प्रभावी मेळ साधण्याचा प्रयत्न केला आहे.
अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लि.चे सीईओ सुशीलकुमार अग्रवाल यांनी सांगितले की, ‘सौभाग्यवती सरपंच २’ ही महिला नेतृत्व, जिद्द आणि सामाजिक परिवर्तनाची प्रेरणादायी कथा आहे. जलसंवर्धन आणि गावपातळीवरील सुशासनासारख्या महत्त्वाच्या विषयांवर भाष्य करणारी ही मालिका प्रेक्षकांना निश्चितच आवडेल, असा विश्वास आहे. महिला नेतृत्व, सामाजिक जबाबदारी आणि परिवर्तनाची प्रेरणादायी कहाणी मांडणारी ‘सौभाग्यवती सरपंच २’ ही वेब सिरीज २४ जुलै २०२६ पासून अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर पाहता येणार आहे.