‘अंत एक प्रारंभ’ ६ नोव्हेंबरपासून अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर; अतुल परचुरे यांना पुन्हा एकदा मानवंदना!
- November 5, 2026
- Ultra Team
आजच्या धावपळीच्या आयुष्यात करिअर आणि स्वप्नांच्या मागे धावताना अनेकदा आपण आपल्या जवळच्या माणसांना वेळ देणं विसरतो. याच विषयावर भाष्य करणारा ‘अंत एक प्रारंभ’ हा मराठी चित्रपट ६ नोव्हेंबर २०२६ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. ज्येष्ठ अभिनेते दिवंगत अतुल परचुरे यांचा हा शेवटचा चित्रपट असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
‘अंत एक प्रारंभ’ची कथा राजवीर आणि प्रद्युम्न या दोन भावांभोवती फिरते. धाकटा भाऊ राजवीर कुटुंबाचा व्यवसाय सांभाळत असतो, तर मोठ्या भावाला प्रद्युम्नला दैनंदिन कामांसाठी इतरांच्या मदतीची गरज असते. कामाच्या व्यापामुळे राजवीरला भावासोबत वेळ घालवता येत नसल्याने तो त्याच्या देखभालीसाठी एका केअरटेकरची नियुक्ती करतो. मात्र, या निर्णयानंतर त्यांच्या आयुष्यात अनपेक्षित घडामोडी घडू लागतात आणि दोघांच्या नात्याचे नवे पैलू समोर येतात.
दोन भावांमधील प्रेम, कुटुंबाप्रती असलेली जबाबदारी आणि नाती जपण्यासाठी वेळ देण्याचं महत्त्व या चित्रपटातून मांडण्यात आलं आहे. करिअर आणि वैयक्तिक आयुष्य सांभाळताना आपल्या माणसांकडे दुर्लक्ष होऊ नये, असा हळवा संदेश ही कथा देते. या चित्रपटात अतुल परचुरे यांच्यासोबत वसीम फरास, मोहन जोशी आणि गिरीश ओक महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. दत्ता मोहन भंडारे यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. अतुल परचुरे यांना पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्याची संधी चाहत्यांसाठी भावनिक ठरणार आहे.
कधी आणि कुठे पाहता येणार?
‘अंत एक प्रारंभ’चा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर ६ नोव्हेंबर २०२६ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर होणार आहे.